Chapter- 9                    विट्‌यात्रशंसा (कविता)


प्रश्न 1.

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार;

परि विदयासम एकहि शोभादायक नसे अलंकार.

उत्तरः

‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.

कवी म्हणतो, ‘जगात वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान रत्नांचे, सोन्याचे दागिने खूप असतील; परंतु विदयेएवढा मौल्यवान आणि शोभिवंत अलंकार दुसरा कोणताही नाही.’ आपले खरे सौंदर्य विदयेमुळे खुलते. .शिवाय, रत्नांच्या किंवा सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ शकते. विदयारूपी अलंकाराची चोरी होत नाही. देवाणघेवाण केल्याने त्याची शोभा वाढत जाते. म्हणूनच, विदयेसमान दुसरा कोणताच शोभादायक अलंकार नाही असे कवी येथे स्पष्ट करतात.

प्रश्न 2.

‘विद्या’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तरः

या जगात शोभादायक / सर्वोत्तम अलंकार कोणता?

(टीप: विद्यार्थी ‘विद्या’ हे उत्तर येईल अशा प्रकारचे इतरही प्रश्न तयार करू शकतात. )

प्रश्न 3.

कवीने वर्णन केलेले विदयेचे महत्त्व.

उत्तरः

‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी स्पष्ट केली आहे.विदयेमुळे संपूर्ण जगामध्ये साऱ्या सजीवांत मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. विदयेच्या जोरावर या जगात कोणतीच गोष्ट असाध्य, अशक्य नाही. विदया हे एकमेव असे धन आहे, जे इतरांना दिल्याने किंवा त्याचा वापर केल्याने वाढत जाते, कधी कमी होत नाही. विविध रत्नांचे, धातूंचे दागिने यांच्यापेक्षाही शोभादायक व खरे सौंदर्य बहाल करणारा दागिना म्हणजे विदया आहे. विदयाप्राप्त व्यक्ती साऱ्या जगात उठून दिसते. विदयेसारखा खरा मित्र नाही, जो सदैव आपल्याला साथ देतो व आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतो. गुरुप्रमाणेच विदयादेखील आपल्याला योग्य मागदर्शन करते, संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य उपाय सुचवते. एखादया कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. विदयादेवी आपल्याला सर्व सुख देते आणि आपली सर्व दुःख दूर करते. योग्य मार्ग दाखवते. अशाप्रकारे, आपले जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी विद्यादेवीचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी विदयादेवीला प्राप्त व प्रसन्न करण्यासाठी तिची मनापासून आराधना केली पाहिजे म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे असे कवीला यातून स्पष्ट करायचे आहे.


प्रश्न  4.

‘त्या विदयादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी’, या ओळीचा सरळ अर्थ.

उत्तर:

विदया आपल्याला सर्व प्रकारची सुखं देते आणि आपली सर्व दुःख दूर सारते. मानवाला सर्व गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या या विदयादेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची मनोभावे आराधना करा असे कवी येथे सांगत आहे.


5. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.

१. मोठेपण

२. नेहमी

३. अलंकार

४. मनातील इच्छा

उत्तर:

१. श्रेष्ठत्व

२. सदैव, सदा

३. भूषणे

४. मनोरथ


6. खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.

१. मित्र

२. सोने

उत्तर:

१. सखा, सवंगडी, सोबती, स्नेही, दोस्त.

२. कनक, सुवर्ण, कांचन, हेम, हिरण्य.

कृती २ – आकलन


7.एका वाक्यात उत्तर लिहा.

कोणत्या व्यक्तीला काहीच उणे नसते ?

उत्तर:

ज्या व्यक्तीला विदया अनुकूल असते, तिला काहीच उणे नसते.


8.‘देउनि किंवा भोगुनि उणें न होतां सदैव वाढतसे

ऐसें एकच विदया- धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे.’

या ओळींचा सरळ अर्थ स्पष्ट करो.

उत्तर:

जगामध्ये विदया हे एकमेव असे अमूल्य धन आहे, जे दुसऱ्याला दिल्याने किंवा उपभोग घेतल्याने जराही कमी होत नाही, उलट नेहमी वाढतच जाते. हा अद्भुत गुण इतर कोणत्याही गोष्टींत नाही, असे कवी येथे म्हणतो.


9.‘विदयेनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं;

न दिसे एकहि वस्तू विदयेनेंही असाध्य आहे जी.’ या ओळींतील भाव स्पष्ट करा.

उत्तर:

‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.

या जगात विदयेमुळेच मानवाला मोठेपणा, श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. विदयेच्या जोरावरच मानवाने विविध क्षेत्रांत प्रगती साधली आहे. विदयेनेही न मिळणारी अशी कोणतीच गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. म्हणजेच, आपल्याकडे जर विदया, ज्ञान असेल, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो. हेच कवीला यातून स्पष्ट करायचे आहे.


प्रश्न 10.

‘या साऱ्या भुवनीं हित कर विदयेसारखा सखा नाहीं; अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही’, या काव्यपंक्तींतील भाव स्पष्ट करा.

उत्तर:

‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.

मानवाला कधीही, कोणत्याही प्रसंगात साथ देणारा, साहाय्य करणारा मित्र म्हणजे विदया आहे. ती नेहमीच आपले हित, कल्याण साधते. म्हणून कवी म्हणतो, की ‘साऱ्या विश्वात विद्येसारखा आपला हित पाहणारा ‘खरा’ मित्र नाही. ज्याला विद्या प्राप्त होते, त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही.’ यश प्राप्त करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी विदयाच मार्ग दाखवते. विदयेसारख्या खऱ्या मित्राची गरज कवी येथे व्यक्त करतो.

11) ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.

उत्तर:

विदयेचे म्हणजेच ज्ञानाचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व हा कवितेचा विषय आहे.


iii. प्रस्तुत ‘कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.

(अ) अद्भुत

(ब) अलंकार

(क) मनोरथ

(ड) सदैव

उत्तर:

(अ) अलौकिक

(ब) दागिना

(क) हेतू

(ड) नेहमी


iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.

उत्तर:

विद्यादेवीची मनोभावे भक्ती करावी व विदयासंपन्न व्हावे हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.


v. प्रस्तुत ‘कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर:

संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर असलेली ही यमकप्रधान रचना आहे. विदयेचे महत्त्व विशद करण्यासाठी प्रत्येक चरणात विदयेची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. कवितेची एकूण सहा चरणात रचना असून प्रत्येक चरण हे एखादया सुविचारासारखे आहे.


vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.

उत्तर:

विदया ही माणसाला सुख मिळवण्यासाठी व दुःख दूर करण्यासाठी आवश्यक आहे. या विदयेची भक्ती करून तिची मनोभावे पूजा करा.


vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा.

‘या परि सकल सुखें जी देई, दुःखें समस्त जी वारी, त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी

उत्तर:

अशाप्रकारे, तुम्हांला परिपूर्ण सुख देणारी आणि सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या विद्यादेवीची मनापासून आराधना करायला हवी.

viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.

उत्तर:

विदयेचे महत्त्व पटवून देताना कवीने अतिशय समर्पक शब्दांद्वारे विदयेची ठळक वैशिष्ट्ये या कवितेत मांडली आहेत. ज्ञानाचे महत्त्व समजावताना ज्ञान माणसासाठी कसे उपयुक्त व जीवन समृद्ध करणारे आहे यासाठी सुयोग्य उदाहरणे दिली आहेत. आपले दुःख, दारिद्र्य, संकटे नष्ट करण्यासाठी विदयेची मनोभावे पूजा करावी हा कवीचा उपदेश खरोखरच सकारात्मक मार्ग दाखवतो. म्हणून, मला ही कविता खूप आवडली.

12.पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.


i. ‘गुरुपरि’ उपदेश करी, संकट समयी उपाय ही सुचवी, चितित फळ देऊनियां कल्पतरूपरि मनोरथा पुरवी.

उत्तर:

कवि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ‘विदयाप्रशंसा’ या कवितेत विदयेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. विदयादेवीची मनोभावे भक्ती केल्याने विदयासंपन्न होता येते असा संदेश या कवितेतून कवीने दिला आहे. गुरुच्या उपदेशाप्रमाणे विदया आपल्याला उपदेश करते असे म्हटले आहे. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे असते. गुरु नेहमीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. कठीण प्रसंगात उपाय सुचवतात. त्यांच्याप्रमाणे विदयादेखील आपल्याला नेहमीच योग्य उपदेश करते. आपल्याला संकटकाळात योग्य उपाय सुचवते व संकटातून सहीसलामत बाहेर पडण्यास मदत करते. तसेच, विदया कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. इच्छिलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करून देते. संस्कृत प्रचुर भाषेच्या वापरामुळे या ओळींना एक गंभीरता प्राप्त झाली आहे. यामुळे, या चरणाला एका सुवचनाचा दर्जा मिळाला आहे. यमकप्रधान चरणांची रचना असून कवीने निवेदनात्मक शैलीचा वापर केला आहे. विदयेला गुरुचा, कल्पतरूची उपमा देऊन कवीने उपमा अलंकार साधला आहे.