अध्याय 8

शिक्षणातील नवप्रवाह 


प्र.१ . (ब)  एका वाक्यात उत्तरे लिहा. 

(१) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार शिक्षण हा मूलभूत हक्क माणून अंतर्भूत केलेला आहे?

उत्तर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१(अ) नुसार शिक्षण हा मूलभूत हक्क मानून अंतर्भूत केलेला आहे.

(२) मुक्त शिक्षण देणाऱ्या कोणत्याही एका राज्यस्तरीय संस्थेचे नाव लिहा?

 उत्तर: मुक्त शिक्षण देणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेचे एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय शिक्षण मंडळ.

(३) सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय?

उत्तर: सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना – मग ते सामान्य असोत की दिव्यांग – एकत्र शिकण्याची संधी देणारे शिक्षण, जे त्यांच्या गरजेनुसार योग्य त्या सुविधांसह दिले जाते.

प्र.५ खालील बाबींवर प्रत्येकी ५० ते ८० शब्दांत उत्तरे लिहा.

(१) संमिश्र अध्ययनाची वैशिष्ट्ये

उत्तर: संमिश्र अध्ययनाची वैशिष्ट्ये:

संमिश्र अध्ययन ही एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये पारंपरिक प्रत्यक्ष वर्गशिक्षण आणि आधुनिक डिजिटल शिक्षण यांचा योग्य संगम केला जातो. यात शिक्षक वर्गात मार्गदर्शन करतात आणि त्यासोबतच ई-लर्निंग, व्हिडीओ, ऑनलाइन कोर्सेस यांचा वापर होतो. ही पद्धत विद्यार्थ्यांना त्यांचा वेग आणि शैलीनुसार शिकण्याची मुभा देते. यात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्ययन अधिक प्रभावी व सहभागी बनवले जाते.

(२) मुक्त शिक्षणाची कार्ये

उत्तर: मुक्त शिक्षणाची कार्ये:

मुक्त शिक्षण हे शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी खुल्या करण्याचे काम करते. यात वय, वेळ, प्रवेश पात्रता यांसारख्या बंधनांपासून मुक्तता दिली जाते. या शिक्षणप्रणालीत दूरस्थ शिक्षण, स्वयंअध्ययन आणि ऑनलाइन साधनांचा वापर करून शिक्षण दिले जाते. ग्रामीण, दुर्गम भागांतील किंवा व्यावसायिक व्यक्तींनाही शिक्षण घेता येते. मुक्त शिक्षण रोजगारक्षमतेत वाढ करते, उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देते.

(३) ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये

उत्तर: ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये:

ज्ञानरचनावादात विद्यार्थी हा स्वतः ज्ञानाचा रचयिता मानला जातो. नवीन ज्ञाननिर्मिती करताना तो आपल्या पूर्वानुभवाचा आधार घेतो. शिक्षक यामध्ये मार्गदर्शक, सुलभक आणि सूत्रधाराच्या भूमिकेत असतो. वर्गरचना, बैठकीची मांडणी, तसेच अध्ययनासाठी आनंददायी वातावरण यावर भर दिला जातो. यात विविध कृती, प्रयोग, समस्या-निराकरण, चर्चा, बुद्धिमंथन आदींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचारसरणी व सर्जनशीलतेचा विकास होतो.

प्र.६ पुढील प्रश्नांची प्रत्येकी १०० ते १५० शब्दांत उत्तरे लिहा.

(१) मुक्त शिक्षणाची संकल्पना व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर: मुक्त शिक्षणाची संकल्पना व वैशिष्ट्ये स्पष्ट करा :

मुक्त शिक्षण ही एक लवचिक आणि सर्वसमावेशक शैक्षणिक पद्धती आहे, जी शिकणाऱ्याच्या गरजा, वेळ, गती आणि परिस्थितीनुसार शिकण्याची संधी देते. पारंपरिक शिक्षणपद्धतीपेक्षा यामध्ये प्रवेश, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, मूल्यांकन आणि प्रमाणपत्रीकरण यामध्ये अधिक स्वातंत्र्य असते. मुक्त शिक्षण हे वय, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय यांसारख्या अडथळ्यांशिवाय सर्वांना खुले असते.

वैशिष्ट्ये :
(१) प्रवेशात अटी-शर्ती नसतात.
(२) शिक्षण घेण्याची वेळ, गती, ठिकाण निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
(३) स्वयंशिकणावर भर असतो.
(४) मुदतबद्ध परीक्षा नसतात; विद्यार्थ्याला तयारीनुसार परीक्षा देता येते.
(५) विविध माध्यमांतून (प्रिंट, ऑडिओ, व्हिडिओ, ऑनलाईन) शिक्षणसामग्री उपलब्ध असते.
(६) काम करणाऱ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते.
मुक्त शिक्षणामुळे शिक्षण लोकाभिमुख, लवचिक आणि सहज उपलब्ध बनते.

(२) कौशल्याधारित शिक्षणाची संकल्पना व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर: कौशल्याधारित शिक्षणाची संकल्पना व वैशिष्ट्ये स्पष्ट करा :

कौशल्याधारित शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कार्य कुशलतेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण. हे शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाही, तर त्यांना रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनासाठी सक्षम बनवते. हे शिक्षण रोजगाराभिमुख असून त्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव व सरावाला महत्त्व दिले जाते.

वैशिष्ट्ये :
(१) विशिष्ट व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांवर भर दिला जातो.
(२) विद्यार्थ्यांना स्वयंपर्यंत व्यवसाय निवडण्यास मदत होते.
(३) शिकवणं केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष कामकाजाशी संबंधित असते.
(४) स्वयंरोजगारासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.
(५) श्रमप्रतिष्ठा व उद्योजकतेचा विकास होतो.
(६) कौशल्यांच्या आधारे जागतिकीकरणाच्या संधी स्वीकारता येतात.
(७) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही हे शिक्षण उपयुक्त ठरते.

कौशल्याधारित शिक्षणामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन समाज व देशाचा सर्वांगीण विकास साधला जातो.

(३) संमिश्र अध्ययनाचे फायदे व मर्यादा स्पष्ट करा.

उत्तर: संमिश्र अध्ययनाचे फायदे व मर्यादा स्पष्ट करा :

संमिश्र अध्ययन (Blended Learning) म्हणजे पारंपरिक वर्गखोल आधारित शिक्षण व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिले जाणारे ऑनलाइन शिक्षण यांचा योग्य समन्वय. या पद्धतीत शिक्षक मार्गदर्शन करतात, तसेच विद्यार्थी स्वतंत्रपणे डिजिटल साधनांद्वारे शिकतात.

फायदे :
(१) विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार शिकण्याची संधी मिळते.
(२) शिक्षण अधिक आकर्षक व परस्परसंवादी बनते.
(३) इंटरनेटसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर केल्यामुळे माहितीचा अधिक सखोल अभ्यास शक्य होतो.
(४) शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद वाढतो.
(५) दूरस्थ शिक्षण शक्य होते, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते.

मर्यादा :
(१) इंटरनेट किंवा डिजिटल साधनांची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात.
(२) तांत्रिक अडचणी किंवा नेटवर्क समस्यांमुळे अध्ययनात व्यत्यय येऊ शकतो.
(३) काही विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षणाची सवय नसल्याने ते मागे राहू शकतात.
(४) शिक्षकांनाही या नविन तंत्रज्ञानात प्रशिक्षित होणे आवश्यक असते.

एकूणच, संमिश्र अध्ययन हे आधुनिक शिक्षणपद्धतीत एक प्रभावी नवप्रवाह असून योग्य अंमलबजावणी झाल्यास ते प्रभावी ठरते.