Chapter- 13 अनाम वीरा
1. कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
(अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
उत्तर: सामान्यतः थोर व्यक्तींच्या मृत्यूनंतर स्मृतिप्रित्यर्थ स्मृतीस्तंभ किंवा समाधी बांधून तेथे रोज ज्योत पेटवली जाते; पण आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांचे मात्र आपल्याला विस्मरण होते, म्हणून कवींनी असे म्हटले असावे.
(आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
उत्तर: सीमेवर महाभयंकर युद्ध पेटले असताना देशप्रेमाने भारलेला हा वीर सैनिक केवळ देशाचाच विचार करतो. आपला सुखी संसार सोडून तो देशाच्या रक्षणासाठी युद्धभूमीवरच्या ज्वालांमध्ये जळायला तयार होतो. त्याच्या या धाडसी व निःस्वार्थ वृत्तीसाठी कवीने असे म्हटले असावे.
(इ) सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
उत्तर: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाची कोणी दखल घेतली नसली तरी, त्यामुळे त्याचे बलिदान वाया जात नाही… आज आपण सर्व सुरक्षितपणे जगतो आहोत हेच त्या सैनिकाच्या बलिदानाचे यश आहे. त्यामुळे सैनिकाचे बलिदान सफल झाल्याचे कवीने म्हटले असावे.
2. अनाम वीरा –
उत्तरः देशाच्या सीमेवर सैनिक युद्धजन्य परिस्थितीत शौर्याने लढतात. त्यातील काहींना शौर्याकरता पुरस्कार दिले जातात किंवा त्यांच्या शौर्यगाथा प्रसिद्ध होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांना माहिती मिळते, परंतु असेही काही वीर आहेत, की त्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत. त्यांच्याविषयी कोणीही आदर, प्रेम व्यक्त करीत नाहीत. मात्र असे असले तरीही त्यांचे शौर्य, पराक्रम अतुलनीय आहे. अशा प्राणार्पण केलेल्या; परंतु फार कोणी दखल न घेतलेल्या सैनिकांसाठी कवीने ‘अनाम वीरा’ ही संकल्पना वापरली आहे.
3. जीवनान्त –
उत्तर: अनाम वीर देशाच्या सीमेचे रक्षण करताना धारातीर्थी पडला. कोणत्याही प्रकारची भीती व आसक्ती न बाळगता त्याने मरणाला स्वीकारले. एका शूर सैनिकाच्या शौर्यपूर्ण अंतिम क्षणास कवीने ‘जीवनान्त’ संबोधले आहे.
4. संध्येच्या रेषा –
उत्तरः सायंकाळच्या पाऊलखुणा जितक्या सहजपणे अंधारात विरून जातात, तितक्या सहजपणे युद्धभूमीवर लढत असताना अनाम वीर निर्भयतेने व आसक्तीविना मरण स्वीकारतो.
5. मृत्युंजय वीर –
उत्तर: ज्याप्रमाणे रात्रीच्या काळोखावर विजय मिळवून पहाटे सूर्य उगवतो, त्याप्रमाणे तेजस्वी अशा या वीराने मरणाला निर्भयपणे सामोरे जाऊन मृत्यूवर विजय मिळविला आहे, त्यामुळे कवीने सैनिकाला ‘मृत्युंजय वीर’ ही उपमा दिली आहे.
6. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे पैपाहुण्यांचा राबता होता. जसे सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना..
उत्तर: असतील शिते तर जमतील भुते.
7. रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली, म्हणतात ना……..
उत्तर: काखेत कळसा आणि गावाला वळसा.
8. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला; पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना..
उत्तर: बैल गेला नि झोपा केला.
9. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, ……….
उत्तर:
खाण तशी माती.
10. अति तेथे माती
उत्तर: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.
11. उथळ पाण्याला खळखळाट फार
उत्तर: फार ज्ञान नसणारी माणसेच बढाई मारतात.
12. गर्वाचे घर खाली
उत्तर: गर्विष्ठ माणसावर शेवटी अपमानित होण्याची पाळी येते.
13. बळी तो कान पिळी
उत्तर: बलवान माणूसच इतरांवर वर्चस्व गाजवतो.
प्रश्न 14. छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा व त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा.
उत्तर: i. कुसुम गजरा करते.
उद्देश्य – कुसुंम, विधेय – गजरा करते.
विस्तार करून पुनर्वाक्य – दहा वर्षांची कुसुम अबोलीचा गजरा छान करते.
ii. ताजमहाल आग्रा येथे आहे.
उद्देश्य – ताजमहाल, विधेय – आहे.
विस्तार करून पुनर्वाक्य – शहाजहानच्या काळात बांधलेला ताजमहाल दिल्लीजवळील आग्रा येथे आहे.
iii. शरद वाचतो.
उद्देश्य – शरद, विधेय – वाचतो.
विस्तार करून पुनर्वाक्य – शाळेत असल्यापासून शरद विज्ञानपर पुस्तके वाचतो.
iv. नदी वाहते.
उद्देश्य – नदी, विधेय – वाहते.
विस्तार करून पुनर्वाक्य – भारताच्या उत्तरेकडील भागातील गंगा नदी हिमालयात उगम पावून पूर्वेकडे वाहते.
15. पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्र. ६२ उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
उत्तर: मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.
Answer by Dimpee Bora