Chapter 17 मुद्रितशोधन
खालील कृती करा.
प्रश्न 1.
मुद्रितशोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रितशोधक. कोणतेही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे आवश्यक असते. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लेखकाबरोबरच ते लेखन निर्दोष करण्यासाठी मुद्रिकशोधक हा घटक महत्त्वाचा असतो. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. आज वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थाचे अहवाल, स्मरणिका, शुभेच्छा पत्रे, इत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात काळानुसार वाढच होणार आहे. ही वाढ समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.कोणत्याही प्रकारच्या लेखनाचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन वाचनीय व निर्दोष होणे, यासाठी मुद्रितशोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रितशोधक व्यावसायिक दृष्टीने प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगातदेखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुद्रितशोधन ही एक कला असून ते एक शास्त्रही आहे तसेच तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रितशोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो.
प्रश्न 2.
मुद्रितशोधनासाठी लागणारी कौशल्ये सविस्तर विशद करा.
उत्तर :
मुद्रितशोधन म्हणजे लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखनातील दोष काढणे. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी दूर करण्याचे मुद्रितशोधकाचे काम असते. त्यासाठी लागणारी कौशल्ये पुढीलप्रमाणे होत. मुद्रितशोधकाला भाषेची उत्तम जाण हवी.केवळ प्रमाणभाषेनुरूप व्याकरणाची शुद्धता तपासणे एवढेच काम मुद्रितशोधकाचे नसून लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण तसेच बिनचूक आहे का? त्यातील संदर्भ अचूक व योग्य आहेत का? हे तपासणे सुद्धा आहे. मुद्रितशोधकाला मुद्रणविषयातील तंत्र, दृष्टी व परिपूर्ण ज्ञान असावयास हवे. आपले ज्ञान अदययावत ठेवण्याची आवश्यकता असते.
कामावरील निष्ठा, अनेक विषयांसहित मजकुरामधील रुची व जाण असण्याची गरज असते.
कामाचा अनुभव हा मुद्रितशोधकाला परिपूर्ण व प्रगल्भ करत असतो.
सक्षम मुद्रितशोधकासाठी चिकाटी, अभ्यासातील सातत्य व सराव या गोष्टींची आवश्यकता असते.
प्रतिभासंपन्न लेखक व जागरुक प्रकाशक यांच्याप्रमाणे तज्ज्ञ मुद्रितशोधक हा तपश्चर्येने आपली ओळख बनवू शकतो.
मुद्रितशोधनासाठी ग्रंथाच्या विषयानुरूप त्या, त्या विषयांचे ज्ञान व भाषेची जाण असणे आवश्यक असते.
अनेक विषयांची रुची व समज असण्याचीसुद्धा आवश्यकता असते.
प्रश्न 3.
‘मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते’, या विधानाची सत्यता स्पष्ट करा.
उत्तर :
लेखकांकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रितशोधन. वृत्तपत्रे, सप्ताहिके, ग्रंथ, पुस्तके, शुभेच्छपत्रे, दिवाळी अंक अशा विविध साहित्याची वाचक संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्यामध्ये लिहिलेला मजकूर आशयदृष्ट्या व्याकरणदृष्ट्या तसेच वाक्यरचना, त्यांतील संदर्भ, लेखननियमानुसार लेखन अचूक आहे की नाही हे पाहणे फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मुद्रितशोधकाची जबाबदारीही वाढते कारण मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करू शकते. उदा. ‘सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ या शीर्षकाऐवजी जर ‘कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ असे प्रसिद्ध झाले तर किती गोंधळ होऊ शकतो हे सांगण्याची गरज नाही. एखादया वाक्याची पुनरावृत्ती झाली किंवा एखादे वाक्य किंवा परिच्छेद गाळला गेला तरी वाचकाला त्या वाक्यांचे अर्थ लागत नाहीत. वाचनातील सलगता निघून जाते. ‘दिन’ या शब्दाचा अर्थ दिवस व ‘दीन’ या शब्दाचा अर्थ गरीब. मग कोणताही दिन असेल जसे वर्धापनदिन किंवा पर्यावरण दिन तो ‘दीन’ असा लिहिला गेला तर एका हस्व वेलांटीमुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलून जातो. असे प्रत्येक भाषेत विविध शब्द आहेत ज्यांच्यामधील एका अक्षरामध्ये जरी व्याकरणदृष्ट्या चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊन गंभीर परिस्थितीतही विनोदनिर्मिती होते आणि हे टाळण्यासाठी मुद्रितशोधनात खूप बारकाईने अचूक दुरुस्त्या करून त्यातील त्रुटी दूर करून लेखन आशयदृष्ट्या शुद्ध करणे गरजेचे ठरते.
प्रश्न 4.
थोडक्यात वर्णन करा.
(a) मुद्रितशोधनाची गरज
उत्तरः
मराठी भाषेत लेखन करतेवेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजकुराच्या लेखनातील शुद्धता तपासणे. लेखनातील व्याकरणाच्या शुद्धतेबरोबरच अचूक संपादन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्याही मजकुरातील आशयाची शुद्धता व ते अचूक असण्याची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरणाच्या दृष्टीने ते लेखन निर्दोष असणे आवश्यक असते. त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते. तसेच लेखनाचे सखोल ज्ञान लेखकाला असतेच असे नाही. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही त्रुटी राहून जातात व लेखनात पुनरुक्तीही होऊ शकते त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते.
(b) मुद्रितशोधन प्रक्रिया
उत्तरः
मूळ लेखन व टंकलिखित मजकुराचे साहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे.
पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या असतील तर त्याचे निराकरण दुसऱ्या वाचनात करून किंवा नवीन आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे व आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी अपेक्षित असते.
तिसऱ्या वाचनात दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासून मजकूर अंतिम छपाईला जाण्याआधी लेखक व मुद्रितशोधकाने कटाक्षाने वाचन करणे.
मुद्रितशोधकाने मजकूर. तपासताना मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा उपयोग करून बाजूला प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष करावी.
मूळ प्रतीतील वाचन मुद्रितात शोधावे. प्रत्येक विरामचिन्हाचा लक्षपूर्वक विचार करायचा असतो.
नंतर लेखक सॉफ्ट कॉपी मुद्रकाकडे पाठवतो. ती योग्य आहे की नाही हे तपासून पुन्हा ती मुद्रक लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित निर्दोष करण्यासाठी पुन्हा ते मुद्रितशोधकाकडे येते. त्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होऊन पुन्हा मुद्रणासाठी पाठविण्यात येते.
प्रश्न 5.
खालील गद्य उताऱ्याचे मुद्रितशोधन करून उतारा पुन्हा लिहा.
रामण अतीषय उत्कृष्ट व्याख्याते होते त्याच व्याख्यान एकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमतत त्यांच भाषण ज्ञान वर्धक असायचच पण अनेक विनोदी आणी किस्से यांनी ते व्याख्यान आपल रंगऊन टाकत ते बोलायला लागले की लोकाला वेळेचं भान च राहत नसे लोकांचे चेरे आनंदं आणि हास्य यांनी फूलुन जा असत असे हे रामन
उत्तरः
मुद्रितशोधन करून उतारा :
रामन अतिशय उत्कृष्ट व्याख्याते होते. त्यांचे व्याख्यान ऐकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमत. त्यांचे भाषण ज्ञानवर्धक असायचेच; पण अनेक विनोदी किस्से यांनी ते आपलं व्याख्यान रंगवून टाकत. ते बोलायला लागले की लोकांना वेळेचं भानच राहत नसे. लोकांचे चेहरे आनंद आणि हास्य यांनी फुलून जात असत, असे हे रामन.
प्रश्न 6.
मुद्रितशोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर लिहा.
उत्तर :
लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे मजकुराची शुद्धता सांभाळणे. त्या मजकुराची आशयशुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाएवढीच मुद्रितशोधकाचीही असते. कोणताही मजकूर वाचताना व्याकरण, वाक्यरचना आणि लेखनानियानुसार लेखन या घटकांचा विचार करून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन निर्दोष करणे म्हणजेच मुद्रितशोधन. भाषेचा दर्जा उत्तम असेल तर एखादा ग्रंथ किंवा पुस्तक परिपूर्ण वाचनीय होते. त्यासाठी मुद्रितशोधनात व्याकरणाचे महत्त्व अधिक आहे. वाक्यरचना, शब्दांची पुनरावृत्ती होत नाही ना, तसेच त्यातील संदर्भ योग्य व अर्थपूर्ण आहेत का याचबरोबरच नाम, कर्म, कर्ता, विशेषण, क्रियापद यांचा अभ्यासही मुद्रितशोधनासाठी महत्वाचा असतो. छापून आलेला मजकूर हा लेखननियमानुसारच असणार अशी वाचकाची अपेक्षा असते. त्यातील संदर्भ तो प्रमाण मानत असतो. त्यासाठी शब्दांच्या जातीचा योग्य क्रम, योग्य विरामचिन्हांचा वापर ते लेखन निर्दोष करते. त्यासाठी मुद्रितशोधकाचा व्याकरणाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत की ज्यांना भिन्न अर्थ आहेत. त्याचा वापर वाक्यात कुठे व कसा वापरायचा त्यावर त्याचे अर्थ अवलंबून असतात. उदाहरण दयायचे झाले तर – हार – फुलांचा हार किंवा हार – पराभव, नाद – आवाज किंवा नाद – छंद मग वाक्यात कोणता शब्द अचूक बसतो हे मुद्रितशोधनात पाहण्याची गरज आहे. कारण वाक्यातील त्या शब्दांच्या उपाययोजनावर त्या वाक्याचा अर्थ अवलंबून असतो. त्यासाठी मुद्रितशोधन आणि व्याकरण यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे. त्याचा अभ्यास हा मुद्रितशोधन या शास्त्रात खूप परिणामकारक ठरतो.
प्रश्न 7.
संगणकाबरोबर स्पेलचेकर असताना मुद्रितशोधनाची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर :
आजच्या नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रितशोधनाचे काम खूप सोपे झाले असले तरी ते निर्दोष झाले आहे असे म्हणता येणार नाही. संगणकीय शब्दलेखन तपासण्याचे काम करणारा (स्पेलचेकर) शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे एवढेच तपासतो. उदा. ball हा शब्द boll असा मुद्रितामध्ये type झाला असेल तर ‘0’ च्या जागी तो a ही दुरुस्ती करू शकतो. तसेच एखादया शब्दाला पर्यायी शब्द देखील वापरू शकतो. परंतु तो शब्द त्या वाक्यात योग्य आहे की नाही, त्या शब्दाचा वाक्याच्या अर्थाशी संबंध अचूक आहे का? हे त्याला समजत नाही. ते काम मुद्रितशोधकाचे असते. एखादया शब्दाला योग्य विशेषण किंवा वाक्याच्या अर्थाला योग्य क्रियापद वापरणे हे मुद्रितशोधकच पाहू शकतो. मजकुरातील एखादा परिच्छेद गाळला गेला, चुकीचे संदर्भ दिले गेले, वाक्याचा क्रम चुकीचा असला तर या गोष्टी स्पेलचेकरच्या लक्षात येत नाहीत. मूळ मजकुरानुसार तपासला जाणारा मजकूर पाहण्याचे काम मुद्रितशोधकाचे असते. स्पेलचेकर हा मुद्रितशोधकाला पर्याय नसून तो मुद्रितशोधकाचा साहाय्यक म्हणून काम करत असतो. त्यामुळे स्पेलचेकरवर संपूर्णतः अवलंबून राहता येत नाही. त्या मजकुरातील त्रुटी दूर करण्याचे आणि शुद्धतेचे काम मुद्रितशोधकालाच करावे लागते. त्यामुळे संगणकाबरोबर स्पेलचेकर असतानादेखील मुद्रितशोधनाची आवश्यकता असते.
8. कृती : खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
घटनांचे परिणाम लिहा.
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – …………………………………
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – …………………………………
उत्तर :
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – की राष्ट्र विकसित होते
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते.
प्रश्न 2.
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [ ……………… ]
(२) [ ……………… ]
(३) [ ……………… ]
(४) [ ……………… ]
उत्तर :
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [त्यांची तज्ज्ञता]
(२) [त्या क्षेत्रातील अधिकार]
(३) [सौंदर्यदृष्टी]
(४) [निष्ठा]
9. चूक की बरोबर ते लिहा.
(a) भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते नसते.
(b) लेखकांनंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रितशोधक असतो.
(c) मुद्रितशोधन ही कला असून ते एक शास्त्र आहे.
उत्तर :
(a) चूक
(b) बरोबर
(c) बरोबर
प्रश्न 10.
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) [ ]
(b) [ ]
उत्तर :
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) मॅजेस्टिक प्रकाशन
(b) ग्रंथाली प्रकाशन
प्रश्न 11.
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) …………………
(b) …………………
उत्तर :
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) पु. ल. देशपांडे
(b) कुसुमाग्रज / वि. वा. शिरवाडकर
प्रश्न 12.
भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते असते.
उत्तर :
भाषा आणि समाज यांचा परस्परसंबंध आहे म्हणून त्यांचे अनन्यासाधारण नाते आहे. आपल्या मनातील भावना, विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचे भाषा हे एक महत्त्वाचे संवादमाध्यम आहे. मानव जेव्हा आदिमानवाच्या काळात रहात होता तेव्हापासून त्याची भाषा त्याच्यासोबत होती. मात्र तेव्हा त्या भाषेचे वेगळे स्वरूप होते. हळूहळू तो समाज करून राहू लागला तेव्हा हावभाव, चित्र, खाणाखुणा या चिन्ह भाषेच्या स्वरूपातून आपल्या भावभावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवत होता. मग त्याने चिन्हव्यवस्था निर्माण केली. निसर्ग, परिसर, दृश्य-अदृश्य गोष्टी यांना त्याने शब्द दिले. ध्वनीच्या मार्फत आपण बोलू शकतो याची त्याला जाणीव झाली. मग मानवाचा हळूहळ भाषिक विकास होऊ लागला. भाषेचा विकास होता होता त्याचा सामाजिक विकास होऊ लागला. राजकीय स्थित्यंतरे, आक्रमणे होत जातात तेव्हा समाज बिथरतो, मिसळतो त्यामुळे भाषेचीसुद्धा सरमिसळ होते. महाराष्ट्रावर पोर्तुगीज, यवन, फ्रेंच यांची आक्रमणं झाली त्यावेळी त्या लोकांनी आपल्या बोलीभाषेतले बरेचसे शब्द आपल्याला दिले.
Answer by Dimpee Bora