Chapter 3                                    अशी पुस्तक     


1. प्रश्न अ.

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….

उत्तर : लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.


प्रश्न आ.

प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …

उत्तर : पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.


प्रश्न इ.

रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..

उत्तर : रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.


2. अर्थ स्पष्ट करा.


प्रश्न अ.

दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे

उत्तर : दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.


प्रश्न आ.

पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे .

उत्तर : पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.


3. व्याकरण :


अ. सूचनेनुसार सोडवा.


प्रश्न 1.

‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..

उत्तर : धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार


प्रश्न 2.

जसे विफलताचे वैफल्य, तसे –

अ. सफलता → ……….

आ. कुशलता → ……….

इ. निपुणता → ……….

उत्तर : अ. सफलता → साफल्य

आ. कुशलता → कौशल्य

इ. निपुणता → नैपुण्य


4. स्वमत :


प्रश्न अ.

वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.

उत्तर: ‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे लेखक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असे सांगितले आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना वैचारिक साहित्य हे मानवी मनाला नेहमी प्रेरणा देते असा व्यापक दृष्टिकोन लेखकाने येथे व्यक्त केला आहे. वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. माणसाला जगण्याचे बळ देतात. मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण कसं असावं हे पुस्तकं सांगतात.

वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते.


प्रश्न आ.

पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :‘अशी पुस्तक’ या पाठातून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले आहे. पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. पुस्तके ही माणसाची जगण्याची हिंमत वाढवतात. प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात.

जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात.

लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे.


प्रश्न इ.

हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : क्रूर नियती व दुर्बल परंतु महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यामध्ये कधीही न संपणारे युद्ध वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. जीवन एक संघर्ष आहे. नियती क्रूर आहे असं आपण अनेकवेळा म्हणतो ते अगदी खरं आहे. आज जगण्या-मरण्याचा खेळ अखंड चाललेला आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मरणाच्या, संकटाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळ टाकलं तरी ते आपण तोडून, फेकून दयायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.

परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे.


5. अभिव्यक्ती :


प्रश्न अ.

उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : ‘अशी पुस्तकं’ या पाठातून लेखक डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असुन उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. अशी व्यापक भूमिका मांडली आहे. महात्मा गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगो आणि मून्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं ‘संत तुकारामांचे अभंग’, ‘संस्कृत महाकवी’ कालिदासाचे मेघदूत, टॉलस्टॉपची ‘अॅना करनिना,’ जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा, हेमिंग्वेचं ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ अशा विविध प्रकारांच्या रसमय साहित्याशी माणसाचे नाते जोडले जाते. उत्तम साहित्य वाचनाने माणसांचा एकाकीपणा दूर होतो.

पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे.


प्रश्न आ.

निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा.

उत्तर : ‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी पुस्तकांचे महत्त्व वर्णन करण्याबरोबर पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोनही सांगितला आहे. लेखकाच्या मते जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. पुस्तकांवर उदंड प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तकं देताना चिंतीत होतात.

पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.


6. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.


प्रश्न अ.

पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे : ………..

उत्तर:

पाक्षिक


प्रश्न आ.

ज्याला एकही शत्रू नाही असा : ………

उत्तर:

अजातशत्रु


प्रश्न इ.

मंदिराचा आतील भाग : ……….

उत्तर:

गाभारा


प्रश्न ई.

गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा : ………….

उत्तर:

आजानुबाहु


प्रश्न उ.

केलेले उपकार न जाणणारा : ……….

उत्तर:

कृतघ्न


7. खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.


प्रश्न अ.

‘काळजीपूर्वक’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.

उत्तर :


काळ

पूर्व

कळ

काक

प्रश्न आ.

‘अंतरंग’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.

उत्तर :

अंत

रंग

तरंग

गत

8. माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.

उत्तर :

‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती जुनी असली तरी त्या उक्तीचे महत्त्व आताच्या जमान्यातही तसूभर कमी झालेले नाही. कारण माणसाचा सर्वागीण विकास होण्यासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यांची विचारप्रवृत्ती वाढते. आकलन व स्मरणशक्ती दोन्हीचा विकास होतो.

आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात.

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते.

संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.


प्रश्न 9.

‘माझी पुस्तक हीच माझी अपत्यं’ हे विधान स्पष्ट करा.

उत्तर :

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगितले आहे. पुस्तके ही माणसाला जन्मभर सोबत करतात. एका ग्रंथप्रेमी वाचकाने ‘माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं आहेत’ अशी प्रतिक्रिया लेखकाजवळ व्यक्त केली. ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर अतिशय प्रेम होते. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांना त्याने जिवापाड सांभाळले होते. आपण आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यांचा सांभाळ करतो.

त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो.

तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं.


Answer by Dimpee Bora