Chapter 5 परिमळ
1. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
प्रश्न 1.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे
उत्तर :
1. ‘पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन’
2. ‘आधी हाताला चटके,
तव्हा मियते भाकर’ ‘नही ऊन, वारा थंडी,
आली पंढरीची दिंडी’
2. व्याकरण.
प्रश्न अ.
प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा…
उत्तर :
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या :
पीठी – व्होटी
जीव – हीव
थंडी – दिंडी
घाई – पुन्याई
नक्कल – अक्कल
प्रश्न आ.
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
बावनकशी सोने
करमाची रेखा
सोन्याची खाण
चतकोर चोपडी
उत्तर :
बावनकशी सोने – अस्सल, खरे
करमाची रेखा – नशीबाचा फेरा, नियतीचा खेळ
सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात
चतकोर चोपड़ी – पुस्तक किंवा वहीचा काही भाग
प्रश्न इ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
1. तोंडात बोटे घालणे.
2. तोंडात मूग धरून बसणे.
उत्तर :
1. तोंडात बोटे घालणे – अर्थ : आश्चर्यचकित होणे, विस्मय वाटणे.
वाक्य : अपंग मुलाने धावण्याची शर्यत जिंकल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली.
2. तोंडात मूग धरून बसणे – अर्थ : काहीही न बोलणे, गप्प बसणे.
वाक्य : सरांनी अवघड प्रश्न विचारताच सर्व मुले तोंडात मूग धरून बसली.
प्रश्न ई
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ – ……………
(आ) कृपा – ……………
(इ) धर्म – …………….
(ई) बोध – …………….
(उ) गुण – ……………..
उत्तर :
(अ) अनर्थ, अर्थहीन, अर्थपूर्ण
(आ) अवकृपा, कृपाळू
(इ) अधर्म, स्वधर्म, धार्मिक, धर्मवीर
(ई) अबोध, बोधामृत
(उ) अवगुण, सगुण, निर्गुण, गुणी, गुणवान
3. स्वमत.
प्रश्न अ
‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे’, हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाई या एक अशिक्षित शेतकरी स्त्री असूनही त्यांची रचना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा झिरपते. त्यांचे काव्य सरस व सोज्वळ आहे. बहिणाबाई यांची कविता इंग्रजी वळणाच्या सौंदर्यवादी भावकवितेच्या परंपरेला छेद देणारी अस्सल मराठी वळणाची ग्रामीण कविता आहे.
जुन्यात चमकणारी ही कविता आहे, बहिणाबाई यांनी आपली कविता थेट संत कवितेच्या आणि तत्त्वकवितेच्या परंपरेला जोडली आहे, त्यांच्या कवितेत या परंपरेतला भक्तिभाव, तत्त्वचिंतन आणि हितोपदेश आपल्याला दिसतो. ही लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता आहे. नवकवितेच्या जवळ जाणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग, ग्रामीण जीवन व कृषिसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते. शेतकरी हा कर्मयोगी आहे आणि त्याच्या कामात उदात्तता आहे असे सांगणाऱ्या या कविता आहेत.
क्तिकविता आहे. त्यात पारंपरिक तत्वकवितेच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. ‘उदा. देव अजब गारोडी’ तसेच ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस!’ यांसारख्या आधुनिक कवितेतून मानवतेचा संदेश देणारी त्यांची कविता आहे.
प्रश्न आ.
‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर :
बहिणाबाईंची कविता ही अर्वाचीन मराठीतील पहिली ग्रामीण कविता होय. ती या अर्थाने की, ती ग्रामीण जीवनातूनच मोहोरून आली आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन अंतर्बाहय रसरसलेले आहे. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत पेरणीनंतर धरित्रीच्या कुशीतून जे चैतन्य ओसंडते त्याचे अतिशय प्रभावी दर्शन घडते. ‘येहेरीत दोन मोटा’ यातून कृषिजीवनाचे दर्शन तर घडतेच पण त्यातील दोन्हीमध्ये पाणी एक यातून कणा आणि चाक वेगळे असले तरी त्याची गती एकच आहे हे दिसून येते.
त्यांची कविता निसर्गाशी समरस होणारी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी आहे. तान्या सोपानाला झोपवून बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटू लागत आणि त्यातून ग्रामीण, कृषिजीवनाचे दर्शन घडविणारी कविता जन्माला येई. वाटेत दिसलेल्या वडाच्या झाडावर ‘हिरवे हिरवे पानं’ सारखी रचना सहज आकाराला येते. शेतातील कापणी, मळणी या शेतातील कामांबरोबरच मोठ्या, भाविक व कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबीत होताना दिसते. थोडक्यात बहिणाबाईंची कविता ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी कविता आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कृषिसंस्कृती यांचं अनोखं असणार नातं त्यांच्या कवितेत दिसून येते.
प्रश्न इ.
“मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाईनी कवितेतून माणसाचा मतलबीपणा आणि त्याच्या स्वार्थी वृत्तीचे वास्तव दर्शन घडविले आहे. बहिणाबाई आणि स्वार्थी वृत्तीची सर्वाधिक चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ ‘माणसा तुला नियत नाही रे’, माणसापेक्षा गोठ्यातील जनावर बरे, गाय न म्हैस चारा खाऊन दूध देतात. पण माणसाचे एकदा पोट भरले की माणस उपकार विसरून जातो. कुत्र्यामध्ये इमानीपणा आहे पण माणूस फक्त मतलबासाठी मान डोलावतो.
माणूस केवळ लोभामुळे माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला आहे. त्याची स्वार्थी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. माणस स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. मानवता आज संपुष्टात आली आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बहिणाबाई ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’? अशी आर्त हाक देतात, संत महात्म्यांनीही मानवतेच्या कल्याणासाठी तळमळ व्यक्त केली आहे. आज माणूस पशूसारखे वागतोय. माणसातला माणूस कधी जागा होतोय? हीच खरी आजची समस्या आहे. स्वार्थासाठी माणूस माणूसपण विसरत आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हे त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लेणं आहे.
4. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
एखादया शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. प्र. के. अत्रे यांच्यासारख्या मर्मज्ञ, प्रतिभावंताची बहिणाबाई चौधरी यांच्या गीतकाव्यासंबंधीची ही प्रतिक्रिया होय. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे प्र. के. अत्रे केवळ प्रस्तावनाकारच नव्हते तर ते प्रकाशकही होते.
प्र. के. अत्रे यांची लिहिलेली प्रस्तावना ही बहिणाबाईंच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख करून देणारी आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांची काव्यप्रतिभा आपल्या प्रस्तावनेतून उलगडून दाखवली आहे. बहिणाबाईंची ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेली समरसता, कृषिजीवनाचे संदर्भ हा त्यांच्या काव्याचा विषय. प्र. के. अत्रे यांनी बहिणाबाईंचे हे सूक्ष्म व अचूक निरीक्षण यांतील आत्मियता लीलया वर्णिली आहे. माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे वर्णन करणाऱ्या कवितेवर अत्रे यांनी प्रकाश टाकला आहे. अत्रे यांनी आपल्या प्रस्तावनेतून बहिणाबाईच्या अनेक कवितांचा अर्थ उलगडून दाखविला आहे.
बहिणाबाईंची कविता हे बावनकशी सोने आहे. ते महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी अत्रे यांनी स्वतः त्या कवितांचे प्रकाशन केले. अत्रे यांनी बहिणाबाईची काव्यप्रतिभा जाणून आपल्या प्रस्तावनेत बहिणाबाईंचे निसर्गप्रेम, कृषी, शेतकरी त्यांचे अपार कष्ट यांचे वर्णन केले आहे. बहिणाबाईच्या ‘संसार’, ‘स्त्रियांची दुःखे’, ‘माणसातला स्वार्थ’ या कवितांवर अतिशय मार्मिक असे भाष्य केले आहे. प्राणिमात्रांचा प्रामाणिकपणा आणि माणसांचा कृतघ्नपणा या बहिणाबाईंच्या कवितेतून अत्रे यांनी नेमकेपणाने त्यांतील भाव उलगडून दाखविला आहे.
अत्रे यांची प्रस्तावना ही अतिशय प्रतिभावंत साहित्यिकाची प्रस्तावना आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील तळमळ, माणसाच्या कल्याणाची आस शेतकरी व त्याचे अपार कष्ट या काव्य आशयाचा सुरेल परामर्श अत्रे यांनी घेतला आहे. थोडक्यात अत्रे यांच्या प्रस्तावनेने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला एक आगळी वेगळी झळाळी लाभली आहे.
प्रश्न आ.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता ह्या निसर्ग, कृषिसंस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, मानवता, प्राणिमात्रांची कृतज्ञता या विषयांशी संबंधित आहेत, बहिणाबाई या अशिक्षित खेड्यातील स्त्री असूनही त्यांच्या काव्यातला जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. त्यांचे काव्य सरळ आणि सोज्वळ आहे.
बहिणाबाईंनी वहाडी, खानदेशी ग्रामीण, बोली भाषेत लिहिलेल्या कवितांना वेगळाच गोडवा आहे. बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. गावातील मंदिरे याच त्यांच्या शाळा असे असतानाही त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. बोली भाषेच्या जिव्हाळ्याने त्यांची कविता आपलीशी वाटते, वहाडी खानदेशी भाषेचे काव्याभिव्यक्तीचे सामर्थ्य फार उंचीचे आहे.
बहिणाबाईंच्या भाषेत जिव्हाळा आहे, तळमळ आहे. माणसाच्या उत्कर्षाची आस त्यांना लागली आहे. ग्रामीण भाषेमुळे, बोलीमुळे शेतकरी, निसर्ग, मानवता या आशयाशी एकरूप होणारी त्यांची कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते. बहिणाबाई काव्य करताना कुठेही अडखळत असलेल्या, शब्दांसाठी थांबलेल्या अशा दिसत नाहीत. ओघवते असे त्यांचे काव्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे म्हणून जे एक अनुभवविश्व होते. त्या अनुभवाची म्हणून जी भाषा होती ती त्यांना पूर्णत: परिचित होती, नव्हे त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांच्या कवितेच्या हातात भाषा हवी तशी वाकते, आकार घेते व अर्थाभिव्यक्ती साधते. या अर्थाने बहिणाबाई या भाषाप्रभूत्व ठरतात.
प्रश्न इ.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
अलिकडच्या काळात माणसातील माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस आज पशू होऊन एकमेकांशी झगडत आहे. पण पशू मात्र आपला इमानीपणा दाखवत आहे. माणूस हा स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला असताना आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील. पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते.
कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण मी अनुभवलेल्या एका प्रसंगातून आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे याचे दर्शन घडते. आमच्या कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग, एका गरीब विद्यायनि शैक्षणिक फी, वहया, पुस्तकांसाठी आणलेले पैसे त्याच्याकडून हरवले. तो विदयार्थी ढसाढसा रडत होता. कारण ते पैसे त्याच्या आई वडिलांनी मजुरी करून मिळवलेले होते. हे पैसे मिळाले नाहीत तर आपले शिक्षण थांबणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एका सेवकाला हे पैसे सापडले व त्याने ते त्या गरीब मलाला परत केले.
त्या गरीब मुलाला पैसे परत मिळण्याचा खूप आनंद झाला. खरं तर त्या सेवकाला सापडलेल्या पैशाच्या पाकीटाचा मोह झाला नाही. तीन महिन्यांच्या पगाराइतकी ती रक्कम असूनही तो मोह टाळून त्याने ते पैशाचे पाकीट परत केले. ही घटना माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचे दयोतक आहे.